श्रीनगर - चीनला भारताच्या भूमीतून हुसकावता आले नाही आणि हे काश्मीरची जमीन लुटायला निघाले आहेत, असे म्हणत पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील जमीन खरेदी-विक्रीस मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता कोणताही भारतीय नागरिक जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकेल. मोदी सरकारच्या या निर्णयाला 'पीडीपी'च्या मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध केला आहे. नवीन कायद्याचा निषेध म्हणून पीडीपी कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पीडीपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावरून मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
जम्मू-काश्मीरची संसाधने हिसकावून, लुटून न्यायची आहेत का?
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'पीडीपी कार्यकर्ते शांततेत जम्मू-काश्मीरची जमीन लुटण्यासाठी भाजप सरकारने मंजूर केलेल्या भूमी कायद्याचा निषेध करत होते. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि मला त्यांना भेटायला परवानगी नव्हती. येथे नागरिक किंवा राजकारणी कोणीही बोलू शकत नाहीत, संपूर्ण जम्मू-काश्मीरचे कारागृहात रूपांतर झाले आहे.