नवी दिल्ली - एका महिन्यापूर्वीच सरकारने ५९ चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर आता पुन्हा अशा आणखी ४७ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश अॅप्स हे आधीच्याच अॅप्सचे क्लोन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अॅप्स प्लेस्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. हे कोणते अॅप्स आहेत याची यादी लवकरच जाहीर होणार आहे.
देशातील नागरिकांच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा लक्षात घेऊन, सरकारने ५९ चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर सरकारने जवळपास २५० अॅप्सला नोटीस पाठवत त्यांचे मॉनिटरिंग केले जाणार असल्याचे सांगितले होते. यासोबत, बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सनाही तातडीने आपली सेवा थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत गोळा केलेली माहिती आणि त्यांच्या ऑफिसेसची लोकेशन याबाबत माहिती मागवण्यात आली होती.
२९ जूनला सरकारने टिकटॉक, यूसी ब्राऊजर, कॅम स्कॅनर अशा ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारे हे अॅप्स असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा :'चीन घुसखोरीबाबत सत्य लपवणारे देशविरोधी'; राहुल यांचा नवा व्हिडिओ जारी