नवी दिल्ली - टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '६९-अ'मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ही अॅप्स आहेत. त्यामुळे, या अॅप्सना देशात बंदी घालण्यात आली आहे.
टिक-टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर देशात बंदी! - Government of India bans Tik Tok
21:46 June 29
20:49 June 29
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, आपला देश हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दिवसेंदिवस प्रगत होतो आहे. मात्र, त्याचवेळी १३० कोटी भारतीयांच्या खासगी माहितीची गोपनीयता, आणि डेटा सुरक्षा याबाबतही चिंता वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असे समोर आले आहे, की असा धोका केवळ लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचा ठरतो आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत, ज्यामध्ये ठरावीक मोबाईल अॅप्स हे लोकांची खासगी माहिती चोरत आहेत. अँड्रॉईट आणि आयओएसवरीलही अनेक अॅप्स लोकांचा खासगी डेटा अवैधरित्या इतर कंपन्यांना विकत आहेत. अशा प्रकारच्या घटना केवळ लोकांच्याच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक आहेत.
भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र आणि केंद्रीय गृहमंत्रालयानेदेखील अशा प्रकारचे धोकादायक अॅप्स बंद करावेत अशी मागणी केली होती. यासोबतच, देशातील अनेक नागरिकांनीही अशा काही अॅप्सबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळेच, सरकारने काही अॅप्सच्या वापरावर बंदी घोषित केली आहे. मोबाईल आणि कम्प्युटर, किंवा असे अॅप्स वापरता येणाऱ्या कोणत्याही उपकरणावर हे अॅप्स वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे.
या अॅप्सवर घालण्यात आली बंदी -
टिक-टॉक, शेअर-इट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बायडू मॅप, शेईन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हेलो, लाईकी, यूकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्यूट्रीप्लस, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेन्डर, क्यूक्यू म्युूझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिंगो लाईव्ह, सेल्फिसिटी, मेलमास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल, वुईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, व्हिवा व्हिडिओ, मेईटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट - हाईड, कॅशे क्लीनर, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेयर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बाईडू ट्रान्सलेट, व्ही-मेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉंचर, यू व्हिडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड्स, डीयू प्रायव्हसी.