बंगळुरु- केंद्र सरकारने चांद्रयान-३ मोहिमेला मान्यता दिली असून, त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज बंगळुरूमधील एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
चांद्रयान-२ मधील विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले नव्हते. मात्र, त्याने खचून न जात, इस्रोने पुन्हा चंद्रावर स्वारी करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. चांद्रयान-२ देखील पूर्णपणे अयशस्वी नव्हते. त्यामधील ऑर्बिटर हे अजूनही कार्यरत असून, पुढील सात वर्षे ते उपयोगी माहिती पुरवत राहील, असेही सिवन यांनी स्पष्ट केले.
'चांद्रयान-३'च्या लाँचिंगसाठी पुढील नोव्हेंबरमध्ये चांगली संधी आहे. यावेळी रोव्हर, लँडर आणि लँडिंग ऑपरेशन्सच्या बाबत अधिक काळजी घेण्यात येईल. तसेच 'चांद्रयान-२'च्या वेळी ज्या कमतरता आढळल्या होत्या, त्याही टाळण्यात येतील, अशी माहिती बंगळुरूमधील सूत्रांकडून मिळाली आहे.
सात सप्टेंबरला इस्रोने लाँच केलेले, 'चांद्रयान-२'चे विक्रम लँडर चंद्रावर कोसळले होते. चंद्रावर हार्डलँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. यानंतर सतत १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो असफल ठरला.
हेही वाचा :इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान-२ ने काढले चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र