पणजी -गोवा सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. लवकरच गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'च्या उद्घाटान प्रसंगी ते बोलत होते.
आजपासून दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागातील नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. विज्ञान महोत्सव यापुढेही सुरू राहावा यासाठी गोवा सरकारने कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीअल रीसर्च आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्याशी यावेळी सामंजस्य करार केला. या करारावर राज्याचे मुख्य सचिव परिमल राय आणि दौलत हवालदार यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने तयार केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित 'लीजेंड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान महोत्सव आयोजनाचा हेतू आणि पर्रीकर यांचा या संदर्भातील दृष्टीकोन स्पष्ट केला.
यावेळी बोलताना डॉ. विजय राघवन म्हणाले, "विज्ञान महोत्सव हा मार्गदर्शनासाठी चांगला पायंडा आहे. तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी गोव्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. या आधारे येथील नैसर्गिक स्रोत विकसित करण्यास मदत होईल"