महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सुमूल'ने नाकारल्याने शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध ओतले रस्त्यावर - milk rate goa

मंगळवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या वेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साळ आणि डिचोली येथील शेतकरी विधानसभेसमोर आंदोलन करण्यासाठी येत असल्याचे समजल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले.

दूध ओतले रस्त्यावर

By

Published : Jul 16, 2019, 10:31 AM IST

पणजी- राज्यातील साळ आणि डिचोली येथील शेतकऱ्यांनी २ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध केला. 'सुमूल' दूध डेअरीच्या अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. याविरोधात संतप्त शेतकरी विधानसभेसमोर आंदोलन करण्यासाठी आले असता त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवारी) पर्वरी पोलीस स्थानकासमोरच दोन हजार लिटर दूध रस्त्यावर ओतले.

'सुमूल'ने नाकारल्याने शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध ओतले रस्त्यावर

मंगळवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साळ आणि डिचोली येथील शेतकरी विधानसभेसमोर आंदोलन करण्यासाठी येत असल्याचे समजल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नाकाबंदी करत पणजी शहराच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात होती. मेघश्याम राऊत यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पर्वरी पोलीस स्थानकासमोर आले असता तेथे त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गाडीमधून आणलेले दूध रस्त्यावर ओतले.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाढीव दराचे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी सुमूल डेअरीला दूध देत होते. परंतु, आज सकाळी आलेल्या सुमूलच्या अधिकाऱ्यांनी लिटमस पेपरद्वारे तपासणी करून साळ येथील शेतकऱ्यांकडील दीड हजार लिटर तर डिचोली येथील शेतकऱ्यांकडील अडीच हजार दूध स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येथे आलेले आहोत. या समुहाने मागील सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांना बोनस दिलेला नाही, तो द्यावा. आमच्याकडील दूध नाकारण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी त्यांनी केला. सरकारच्या मालकीच्या गोवा डेअरीमधील भ्रष्टाचार जगजाहीर असल्यामुळे गोवा डेअरीला शेतकरी दूध देत नसल्याचे राऊत म्हणाले.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतण्यापूर्वी सरकारला कल्पना द्यायला हवी होती. शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करत भडकवणारी व्यक्ती स्वतः चे राजकारण करत आहे. त्यांना जर खरचं शेतकऱ्यांचा कळवळा असता तर शिष्टमंडळ घेऊन सरकारला निवेदन दिले असते. सरकार चर्चेला तयार आहे. त्यातून हा प्रश्न सूटू शकतो आंदोलनाने नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने मंगळवारी विधानसभा सुरू होण्यापूर्वी सुमूलचे संचालक आणि गोवा सरकारच्या संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, कुडतरीचे काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. जेव्हा सदळ डेअरी आणण्याचा सरकार प्रयत्न करत होते. त्या वेळी याला विरोध करत हे गोमंतकीयांच्या त्रासाचे ठरेल असे मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या दोन्हीही मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. अशीच गत गोवा माईल्समुळे भविष्यात गोवा टॅक्सी उद्योगाची होईल, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details