पणजी - एकही मतदार मतदानापासून दूर राहू नये यासाठी गोवा निवडणूक आयोगातर्फे वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जात आहेत. प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी बाकी असताना आज सकाळी साडेसात वाजता उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात 'कर्तव्य' हा वॉकथॉनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, कर्मचारी, प्रचारदूत सहभागी झाले होते.
उत्तर गोवा जिल्ह्यासाठीचा वॉकथॉनचा मार्ग मिरामार सर्कल ते ताळगाव बाजारपेठ असा होता. मिरामार येथून सकाळी साडेसात वाजता वॉकथॉनला सुरुवात झाली. यामध्ये गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आर. मेनका आणि उत्तर गोव्यातील विधानसभेच्या २० मतदार संघामध्ये प्रत्यक्ष निवडणूक कामात सहभागी होणारे कर्मचारी, मतदार जागृतीसाठी नियुक्ती करण्यात आलेले प्रचारदूत सहभागी झाले होते.