पणजी- केवळ कोणाला तरी फायदा पोहचविण्यासाठीचा प्रयत्न एक्झिट पोलच्या माध्यमातून होत असेल तर त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर बंदी घालावी, अशी मागणी गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केली. ते काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकारा परिषदेत बोलताना बाबू कवळेकर...
कवळेकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत लोकांचा कल काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे भाजप पदाधिकारी म्हणत आहेत. अशा वेळी दाखविण्यात येणाऱ्या एक्झिट पोल (निवडणूक अंदाज) मध्ये गोव्यात काँग्रेसला एकही जागा दाखवली जात नाहीत. त्यामुळे हे अंदाज कशासाठी घेतले जात आहेत. या विषयी शंका येते.
एक तर ते सरकार जनमत आपल्या बाजूने वळवून काही तरी वेगळे घडवून आणण्याचा, घटक पक्षांवर दबाव आणण्याचा अथवा मतदान यंत्रात फेरफार करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका येते. मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता असल्याचे कारण सांगून विकास कामे करू दिली जात नाही, अशा वेळी मतदान अंदाज व्यक्त करून लोकांच्या मताचा अनादर निवडणूक आयोग कसा सहन करतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गोव्यातील निवडणुकांविषयी वर्तवले गेलेले अंदाज आतापर्यंत खोटे ठरले आहेत, असे सांगून कवळेकर म्हणाले, 2017 च्या गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला 27 ते 28 जागा तर काँग्रेसला 8 किंवा 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात काँग्रेसने 17 जागा जिंकल्या तर भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे. येत्या 23 मे नंतर गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा दावाही कवळेकर यांनी केला.