पणजी-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने तारीख जाहीर केल्यानंतर पुढील तयारीसाठी किमान पाच महिने लागतात. त्यामुळे यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धा घेणे अशक्य आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी भाजप आमदार विल्फ्रेड डिसा यांनी तारांकित प्रश्नोत्तरात प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित न केल्यामुळे ऑलिम्पिक महासंघाने दंड आकारला का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी ऑलिम्पिक महासंघाकडे स्पर्धेसाठी तारीख मागितली होती. परंतू, आजही तारीख दिलेली नाही. मात्र, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी सुरू असून ऑगस्ट महिन्यात काहींचे उद्घाटन करण्यात येईल. यासाठी आतापर्यंत 316 कोटी रुपये खर्च केला आहे. यासाठी अजून 158 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष स्पर्धेसाठी 200 कोटींचा खर्च अंदाजित असल्याचे सांगितले.
मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी यासाठी किती खर्च केला जाणार आहे आणि तो कसा असा प्रश्न विचारला. त्यावर आजगावकर म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. यासाठी केंद्राने 97 कोटी रुपये दिलेले आहेत. यापूर्वी प्राप्त निधीमधून बांबोळी, ताळगाव आणि पेडे-म्हापसा येथे नवी स्टेडियम उभारण्यात आली आहेत. तसेच फातोर्डा येथील स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले.
यावर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सध्यस्थिती नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेणे कठीण आहे. कारण तारखा जाहीर झाल्यानंतर पुढील तयारीसाठी किमान पाच महिने लागतात. ज्यामध्ये काही क्रीडा साहित्य हे विदेशातून आयात करावे लागेल. तसेच स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा हेतू आहे. अजून गोव्याचे संघ निवडले गेलेले नाहीत. तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्पर्धा घेणे शक्य आहे. त्याला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सहमती दर्शवत मार्च महिना योग्य ठरेल असे सांगितले.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होतील, असे लेखी उत्तर क्रीडा मंत्र्यांनी दिले होते.