पणजी- कोविड - 19 च्या लढाईत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रीय खाण खात्याने जिल्हा खनिज निधीतील 52 कोटींचा निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकार 200 व्हेंटिलेटर खरेदी करत आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आल्तिनो-पणजी येथील महालक्ष्मी निवासस्थानी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा सरकारने दक्षिण गोव्यात सुरू केलेल्या रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच व्हायरालॉजी प्रयोगशाळा आजपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. काही प्रमाणात रोजच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याकरिता अन्न आणि औषध प्रशासन राज्यातील घाऊक औषध विक्रेत्यांच्या संपर्कात असून आवश्यकसाठा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात लोकांना पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. तसेच आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून धान्याची वाहने सोडण्याची विनंतीही केली आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.
गोव्यात 10 शिबिरांत बेघरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी त्यांना आवश्यक जेवण वेळेवर देण्याचे काम करत आहेत. काहींना ते भाड्याने राहत असलेल्या खोलीवर सोडण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळाच्यावतीने त्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून 252 टनांहून अधिक भाजीचे वितरण करण्यात आले आहे.