पणजी - गोव्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच नाट्यमय घडामोडी चालू आहेत. भाजपने काँग्रेसचे १० आमदार फोडत काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. आज गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. मंत्रिमंडळातील ४ जणांना बाजूला करुन नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या ४ आमदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे.
गोवा विधानसभा: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या १० पैकी ४ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी, तर ४ मंत्र्यांना डच्चू - pramod sawant
गोव्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच नाट्यमय घडामोडी चालू आहेत. भाजपने काँग्रेसचे १० आमदार फोडत काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. आज गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आघाडीतील घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (उपमुख्यमंत्री तथा नगरनियोजन), जयेश साळगावकर (गृहनिर्माण), विनोद पालयेकर (जलस्रोत) आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे (महसूल) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. तर त्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबू कवळेकर, बाबूश मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्यासह मागील अनेक वर्षे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले विद्यमान उपसभापती मायकल लोबो यांची वर्णी लागणार आहे.
उपसभापती मायकल लोबो आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर उपसभापतीपदी काँग्रेसमधून आलेल्या इजिप्त फर्नांडीस यांची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदल आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी दोनापावल येथील राजभवनात आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.