पणजी - अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री का अटक करण्यात आली? सभापतींनी याला परवानगी कशी दिली? असा प्रश्न करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला. यानंतर सभापतींनी 25 मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच काळात बुधवारी भाजप पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे आणि मध्यरात्री पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यात आली. यानंतर पहाटे जामिनावर सुटका करण्यात आली. याचा निषेध म्हणून काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष आमदारांनी दंडावर काळ्या फिती बांधून सभागृहात प्रवेश केला.
विरोध पक्षनेते दिगंबर कामत यांनी सभागृहाचे कामकाज सुरू असताना सदस्याला कोणत्या कायद्याने अटक करण्यात आली असा सवाल केला. यावेळी सभापती राजेश पाटणेकर म्हणाले, बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या घटनेची तक्रार प्रेमानंद म्हांबरे यांनी आपल्याकडे केली होती. यावर गोवा विधानसभेच्या कायद्यानुसार कारवाई केली. मात्र, त्याने समाधान न झाल्याने विरोधी सदस्य उठून उभे राहिले.
हेही वाचा -'मोदी-केजरीवाल द्वेषाचं राजकारण करतात'
यावर कामत म्हणाले, ज्या घटनेचा उल्लेख करून खंवटे यांच्यावर कारवाई केली तेव्हा सभागृहातील ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे उपस्थित होते. मात्र, सभापती ऐकण्यास तयार नाही हे दिसताच विरोध पक्ष सदस्य त्यांच्या समोरील दालनाकडे जाऊ लागले. यानंतर सभापती पाटणेकर यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.