सासाराम (बिहार) -वडील शहरात सायकल रिक्षा चालवायचे आणि त्यावर घरचा उदरनिर्वाह व्हायचा. मात्र, लॉकडाऊन लागले आणि वडिलांची रिक्षा बंद पडली. त्यामुळे खायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. वडील रिक्षा घेऊन बाहेर पडले तर पोलीस दंडुक्याचा मार देतात. या सर्व परिस्थितीचा विचार करत ती रिक्षा घेऊन रस्त्यावर उतरली. ही कहाणी आहे बिहारमधील सासाराम येथील १४ वर्षीय नंदिनीची...
पोटासाठी १४ वर्षीय मुलगी सायकल रिक्षा घेऊन उतरली रस्त्यावर - मजुरांवर लॉकडाऊनचा परिणाम
लॉकडाऊनमध्ये अनेक मुजरांचा रोजगार हिरावला गेला. त्यातच कोरोना विषाणूचे संकट आहे. त्यात उदरनिर्वाहाचे काय? असा प्रश्न सर्वांना पडला. त्यातच बिहारच्या १४ वर्षीय मुलीने आपल्या कुटुंबासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला.
नंदिनी बैलिया येथे आपल्या कुटुंबासोबत राहते. तिचे वडील रिक्षा चालवायचे आणि त्यावर घर चालायचे. पण, लॉकडाऊनमध्ये रिक्षावर बंदी आली. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची परिस्थिती नंदिनीला बघवत नव्हती. त्यामुळे नंदिनीने रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला आणि रिक्षा घेऊन ती रस्त्यावर उतरली. पायडलवर पाय पुरत नसताना देखील ती रिक्षा चालवते. ते फक्त कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी. तिची मेहनत पाहून पोलीस देखील तिला मदत करतात. त्यामुळे सर्वजण नंदिनीचे कौतुक करत आहेत.