हैदराबाद : भारत बायोटेकने तयार केलेल्या 'कोव्हॅक्सिन' या कोरोनावरील लसीच्या 'अत्यावश्यक' वापरासाठी आज डीसीजीआयने परवानगी दिली. यानंतर भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. एल्ला म्हणाले की डीसीजीआयने दिलेल्या परवानगीमुळे आम्हाला इतर उत्पादने बनवण्यासाठीही हुरुप आला आहे.
एल्ला यांनी सांगितले, की रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या एकापेक्षा अधिक प्रोटीन्सचा मिळून कंपनीने उत्कृष्ट सुरक्षा डेटा तयार केला आहे. जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आपली लस पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे. कोव्हॅक्सिन लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. भारत बायोटेकने आतापर्यंत केलेल्या संशोधनातील सर्वात मोठ्या स्तरावील संशोधन म्हणजे कोव्हॅक्सिन आहे, असे एल्ला यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.
देशातील सर्वात मोठी मानवी चाचणी..
देशात आतापर्यंत झालेल्या सर्व मानवी चाचण्यांमध्ये भारत बायोटेकने केलेली चाचणी सर्वात मोठी होती. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू केला होता. या टप्प्यामध्ये आम्ही देशभरातील २३ हजार स्वयंसेवकांना या लसीचा डोस दिला. स्वयंसेवकांनीही मोठ्या प्रमाणावर चाचणीला प्रतिसाद दिला. आता देशातील आणि देशाबाहेरील लोकांसाठीही लसीचे उत्पादन घेण्याचे आमचे ध्येय आहे असे कृष्णा म्हणाले.