महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2019, 10:34 PM IST

ETV Bharat / bharat

श्रीनगरच्या विमानतळावरून गुलाम नबी आझादांना पाठवले परत

काँग्रेसने जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यास तसेच, दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यास विरोध दर्शवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांवर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली होती.

गुलाम नबी आझाद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून काँग्रेसने सरकारला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली होती. राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आज जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी श्रीनगरला पोहोचले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करत विमानतळावरच रोखले. त्यानंतर त्यांना नंतरच्या विमानाने दिल्लीला परत पाठवण्यात आले आहे.

आझाद यांना दुपारी ३.३० च्या विमानाने परत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. 'संसदेचे सत्र संपल्यानंतर मी नेहमीच काश्मीरला जात असतो. मी कोणाचीही परवानगी घेतली नाही. लोकांच्या कठीण काळामध्ये त्यांच्यासोबत राहण्यासाठी मी निघालो आहे,' असे आझाद यांनी म्हटले होते.

काँग्रेसने जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यास तसेच, दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यास विरोध दर्शवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांवर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली होती. 'जम्मू-काश्मीरमधील लोक चिडले आहेत. आधी संचारबंदी लागू झाली आणि नंतर कायदा मंजूर झाला, असे हे पहिलेच राज्य आहे,' असे ते म्हणाले.

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्याला तसेच, आर्टिकल ३७० हटवण्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूरी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details