नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगरला गेलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळाला शनिवारी विमानतळावरच रोखण्यात आले. राज्यपालांनीच तेथे येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर त्यांना विमानतळावरून बाहेर पडण्यास मज्जाव करत पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. यानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच, विमानातील काश्मीरींकडून काश्मीरमधील भयानक कहाण्या समजल्याचा दावाही त्यांनी केला.
'आम्हाला विमानतळावरच रोखले, शहरात जाण्याची परवानगी नाकारली. मात्र, आमच्या विमानातूनच प्रवास करणाऱ्या काश्मिरी लोकांनी सांगितलेल्या घटना ऐकून दगडालाही अश्रू फुटतील. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती भयावह आहे', अशी प्रतिक्रिया आझाद यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली आहे.
काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या नेत्यांना हात हलवत परतावे लागले. यानंतर काश्मीरच्या परिस्थितीबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'विरोधकांना परिस्थितीची पाहणी करु दिली जात नाही. मोदी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय,' असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. तसेच, विरोधकांच्या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही गैरवर्तणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असून तेथील लोकांच्या समस्या ऐकून दगडालाही अश्रू आवरता येणार नाहीत असे म्हटले आहे.
यापूर्वीच काश्मीरमध्ये सर्वकाही सामान्य नाहीये अशी टीका राहुल गांधींनी केली होती. काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी तेथून परतल्यावर दिल्लीत केली आहे.