श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी नजरकैदेत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांना मुक्त केले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी म्हटले आहे. शुक्रवारी अधिकृत आदेश जारी करत जम्मू-काश्मीर सरकारने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांची अखेर सुटका केली आहे. आज आझाद यांनी फारूक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चे नेते फारूक अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना “जम्मू-काश्मीरमध्ये प्रगती करायची असेल तर श्रीनगरमध्ये नजरकैदेत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांना मुक्त केले पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. योग्य कार्यपद्धतीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात आल्या पाहिजेत. लोक त्यांना हव्या असलेल्या पक्षाला निवडून आणतील, अशी मागणीही आझाद यांनी यावेळी केली आहे.