नवी दिल्ली -राजस्थानच्या जनतेला उद्देशून एका खुल्या पत्राद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या आपल्या पत्रात, ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचा आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे, असे सतीश पुनिया म्हणाले. राज्यातील अस्थिरतेसाठी त्यांनी गहलोत सरकारला जबाबदार धरले.
राजस्थानमध्ये अराजकता आणि अस्थिरता माजवण्यात गेहलोत सरकार जबाबदार आहे. मात्र, तरीही ते कोणत्याही कारणाशिवाय भाजपावर दोषारोप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले आहे की, त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचा आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे, असे सतीश पुनिया म्हणाले.
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये टोळांचे हल्ले होत आहेत. विकासाची कामे रखडली आहेत आणि राज्य सरकारने घटनात्मक संकटाच्या बहाण्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये आपले बस्तान बसवले आहे. आमदार आणि मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून कसे आनंद लुटत आहेत, हे लोक पहात आहेत, असेही पुनिया म्हणाले.
दरम्यान राजस्थानत उद्भवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप लावला आहे. राजस्थानात लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेल्या सरकारला घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न होत आहे. या मुद्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा हात आहे. आमच्या पक्षाचे अति महत्वाकांक्षी नेतेही यात सामील आहेत. सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही, असे गेहलोत यांनी पत्रात म्हटले आहे.