नवी दिल्ली :ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पडताना दिसून येत आहे. त्यातच आज भारतीय किसान युनियनचे प्रमुख नरेश टिकाईत यांनीदेखील गाझीपूर सीमेवर सुरू असलेले आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांचे भाऊ आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकाईत यांनी मात्र हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरू राहील, की संपेल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नरेश टिकाईत यांची आंदोलन थांबवण्याची घोषणा..
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकाईत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की ४० शेतकरी संघटना एकत्र लढत होत्या. मात्र, आता यात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही. जर सर्वच इथून जात आहेत, तर आम्ही तरी थांबून काय करणार? असे म्हणत त्यांनी हे आंदोलन आज संपत असल्याची घोषणा केली.
आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आंदोलन सुरू ठेवणार - राकेश टिकाईत..
तर दुसरीकडे, भाकियूचे प्रवक्ते राकेश टिकाईत म्हणाले, की आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहे. प्रशासनाने सध्या आम्हाला दिली जाणारी वीज आणि पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र, तरीही आम्ही मागे हटणार नसून, अगदी आमच्या गावांमधून पाणी आणू मात्र आंदोलन सुरुच ठेऊ, असेही राकेश म्हणाले.
गाझीपूर सीमेवरील आंदोलनाबाबत संभ्रम; राकेश-नरेश टिकाईत यांच्यात दुमत दरम्यान, गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत या हिंसाचाराबाबत ३३ गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय ४४ लोकांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी आम्ही तुरुगांत जाण्यास तयार आहोत, मात्र आंदोलन बंद करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :दिल्लीत शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा मृत्यू