नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी राहुल गांधींना अडवत ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. यासंपूर्ण घटनेनंतर गौतमबुद्ध नगर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना प्रशासकीय गाडीमध्ये बसवून कालिंदी कुंज बॉर्डरवर सोडले आहे. येथून दोघेही दिल्लीला रवाना झाले. तथापि, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि गौतमबुद्ध नगरमधील काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राहुल-प्रियांका दिल्लीला रवाना, पोलिसांनी सरकारी गाडीतून कालिंदी कुंज बॉर्डरवर सोडले - हाथरस बलात्कार प्रकरण
उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना सरकारी गाडीमध्ये बसवून कालिंदी कुंज बॉर्डरवर सोडले आहे. येथून दोघेही दिल्लीला रवाना झाले.
राहुल आणि प्रियांका पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना यमुना एक्स्प्रेस पोलिसांनी थांबवले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. यात राहुल गांधी जमिनीवर पडले.
तथापि, साथीच्या आजार कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही त्यांना इथेच थांबावले आणि पुढे जाऊ दिले नाही, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त रणविजय सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.