मुंबई- कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासरकर याला हवाला रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली.
बुधवारी रात्री मुंबई विमानतळावरून रिजवान हा देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने त्यास अटक केली. याआधी दाऊदचा हस्तक फहीम मचमच याचा विश्वासू अहमद राजा वाडारीया यास हवाला प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दाऊदच्या पुतण्याला अटक झाली आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबई पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे, की राजा वडारीया याच्या चौकशीत रिजवानचे नाव पुढे आले. मुंबई विमानतळावर तो येणार असून देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला. यात रिजवान अडकला. त्याला लगेच अटक करण्यात आली.