अमरावती - महात्मा गांधींच्या तेलुगु प्रांताशी अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. खासकरून विजयवाडाशी त्यांचे विशेष नाते होते. आपल्या आयुष्यभरात गांधीजींनी आंध्र प्रदेशच्या या भागाला सहा वेळा भेट दिली होती. गांधीजींच्या पहिल्याच भेटीत तब्बल ६ हजार तेलुगु भाषिक लोक स्वातंत्र्यलढ्यात बापूंच्या सोबत उभे राहिले. आपल्या तिसऱ्या भेटीत गांधीजींनी विजयवाडामध्ये लोकांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
१९२१ मध्ये बापू विजयवाडामध्ये सात दिवस राहिले होते. त्याचवेळी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाची सभा देखील घेतली. बंदर रोड येथे सध्या असलेल्या बापू संग्रहालयाच्या जागेवर ही सभा घेण्यात आली होती. येथेच पिंगली वेंकय्या यांनी गांधीजींना 'तिरंगा' सोपवला होता. यावेळी सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित होते.