वर्धा - शहरापासून अवघ्या काही अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या आश्रमाने वर्ध्याची ओळख देशालाच नव्हे तर जगाला करुन दिली. महात्मा गांधीनी दिलेला सत्य अहिंसेचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. दिडशे वर्षानंतरही गांधीचे विचार अजरामर आहेत. अशा या थोर महात्म्याला समजून घ्यायचे असेल, तर 'सेवाग्राम आश्रम' नामक विद्यापीठातील त्यांच्या जीवनातील महत्वाचा धडा वाचलाच पाहिजे.
हेही वाचा : गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
आद्य आदी निवास...
३० एप्रिल १९३६ मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आले. यापूर्वी ते १७ एप्रिलला सेवाग्राम म्हणजे सेगावला गावातील लोकांना भेटले. ३० एप्रिलला येथे आले असताना राहण्यासाठी कुटी नसल्याने गांधीजी 'आद्य आदी निवास' म्हणजे तत्कालीन पेरुची बाग आणि एक विहीरीजवळ असलेल्या झोपडीत राहिले. साधारण पाच दिवस गांधीजी या झोपडीत राहीले.
आदी निवास...
जमनालाल बजाज यांना सांगून गांधीजींनी कुटी बांधण्यास संगीतले. ही कुटी एकदम सामान्य असावी. तिला १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च लागू नये; आसपासच्या गावातील संसाधनांचा उपयोग करून आणि स्थानिक मजुरांच्या हाताने कुटी बांधावी; असे सांगून गांधी ५ मे १९३६ला खादी यात्रेकरिता निघून गेले. यानंतर १६ जून १९३६ मध्ये गांधीजी परत आले. तेव्हा आदी निवास तयार झाले होते. हे आदी निवास मीरा बेन आणि बलवंत सिंघ आणि गावकऱ्यांच्या मदतीने दीड महिन्यात तयार करण्यात आले होते. याच्या बांधकामासाठी ४९९ रुपये खर्च आला होता. बापूंना हे कळल्यावर ते नाराज झाले होते. मात्र, जमनालाल बजाज हे त्यांची समजूत काढण्यास यशस्वी ठरले.
या कुटीला बापूंच्या मृत्यूनंतर 'आदी निवास' असे नाव देण्यात आले. याच निवासात बापूंची तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खान, गांधींजींचे सेक्रेटरी प्यारेलाल, नेहरू, पटेल यांसह देशातील अनेक व्यक्ती त्यांना भेटून गेले. १९४२च्या 'चले जाव' नाऱ्याची पायाभरणीही याच कुटीतील बैठकीत झाली होती.
बापू कुटी...
यानंतर, दीड वर्षांनी १९३७च्या शेवटी मिराबेन राहत असलेल्या कुटीत बापू राहायला गेले. त्याच कुटीला 'बापू कुटी' म्हणून आज ओळखले जाते. सुरुवातीला लहान असलेली ही कुटी, बापू रहायला गेल्यानंतर मोठी करण्यात आली. यात स्नानगृह, औषध उपचार केंद्र बांधण्यात आले. या ठिकाणी अनेक बैठका होत. अनेक लोक बापुंना भेटायला येत. या ठिकाणी बापू ८ वर्ष राहिले होते.
बा कुटी...
जमानाला बजाज हे कस्तुरबांना आईच्या स्थानी मानत होते. 'बा' कस्तुरबा यांना अडचण होत असल्याने त्यांच्यासाठी 'बा कुटी' तयार करून दिली. कालांतराने महिला भगिनी आल्यास त्या बां सोबत याच कुटीत रहायच्या.
आखरी निवास...
बा कुटीच्या जवळच जमनालाल बजाज यांनी स्वतःसाठी कुटी बांधून घेतली होती, पण ते त्यात राहू शकले नाहीत. बापूंचे मुख्य सचीव महादेवभाई हेही इथेच सहकुटुंब राहिले. तसेच सुशीला नायर यांनी याच झोपडीत रोग्यांवर उपचार केले. आज सेवाग्राममध्ये 'कस्तुरबा हेल्थ सोसायटी'च्या भव्य दवाखान्याचा पाया याच कुटीतून रोवला गेला.