नवी दिल्ली - भारत पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला अनेक मुद्द्यांवरुन घेरताना दिसत आहे. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. पाकिस्तानात जाणाऱया भारतातील ३ नद्यांचे पाणी रोखून ते यमुना नदीत आणल्या जाणार आहे, अशी घोषणा सरकारने केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे, की भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचे पाणी आम्ही रोखणार आहोत. आम्ही या पाण्याला मोडून जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
गडकरी यांनी आणखी एक टि्वट केले आहे. शाहपूर-कांडीमधील रावी नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरू झाले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. उझ नदीचा प्रकल्प आमच्या वाट्यातील पाण्याला जम्मू-काश्मीरमध्ये प्रयोगासाठी साठवणार आहे. या सर्व प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या तिन्ही नद्यांमधील पाणी वापरण्याचा दोन्ही देशांना समान अधिकार प्राप्त झालेला होता. आपल्या या ३ नद्यांमधील पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीमध्ये वळवण्यासाठी आम्ही प्रकल्प उभारणार आहोत. यानंतर यमुना नदीच्या पाणीसाठ्यात वाढ होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.