इंदौर - पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. ही टीम राज्यातील कायदा सुव्यवस्थेची पाहणी करणार असून केंद्राला अहवाल पाठवणार आहे. तर दुसरीकडे राजकीय हिंसा आणि कायदा व्यवस्थेबाबत राज्यपालाच्या अहवालानंतर भाजपाने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारचे भविष्य आता निवडणूक आयोग आणि कायदा व्यवस्थेबाबत राज्यपालांच्या अहवालावर अवंलबून आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
पश्चिम बंगालमधील हिंसा रोखण्यात यायला हवी. आगामी विधानसभा निवडणुका निष्पक्ष व्हायला हव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आज निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेली आहे. याचबरोबर राज्यपालही एक अहवाल राष्ट्रपतींना पाठवत आहेत, असे विजयवर्गीय यांनी सांगितले.