हैदराबाद- परतीच्या पावसाने शनिवारी पुन्हा हैदराबादला झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरात सायंकाळी वाहतुकीची कोंडी आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.
पावसाने हैदराबादला पुन्हा झोडपले...नागरिकांची उडाली तारांबळ - telangana rain latest news
हैदराबादमध्ये शनिवारी पुन्हा पावसाने कहर केला. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना अचानक सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.
सरकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी रात्री साडेआठ ते रात्री १२ दरम्यान मेदचल मलकजगिरी जिल्ह्यातील सिंगापूर टाऊनशिपमध्ये १५७.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर उप्पलजवळ असलेल्या बंदलगौडामध्ये १५३ मिमी पावसाची नोंद झाली. हैदराबादमधील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या आपत्कालीन कृती दलाने (डीआरएफ) तातडीने काम सुरू केल्याचे विश्वजीत कामपटी (संचालक, दक्षता आणि आपत्कालीन व्यवस्थापन) यांनी ट्विट करून सांगितले. अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी पाण्याच्या प्रवाहात अडकलेली कार जेसीबीच्या मदतीने काढली.
दरम्यान १५ ऑक्टोबरला अतिवृष्टीने ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणाचे सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा सरकारचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने देशात तेलंगणासह महाराष्ट्र, कर्नाटकला अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला आहे.