नवी दिल्ली -देशातील स्थलांतरीत कामगारांना पुढील दोन महिन्यांपर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे, अशी घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. याचा फायदा देशातील आठ कोटी स्थलांतरित कामगारांना होणार आहे. तसेच यासाठी ३,५०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती आज अर्थमंत्र्यांनी दिली. यामध्ये त्यांनी या पॅकेजमध्ये कामगार आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या तरतुदींची घोषणा केली. यामध्ये त्यांनी सांगितले, की ज्या कामगारांकडे केंद्राचे अथवा राज्याचेही रेशन कार्ड नाहीये, अशा साधारणपणे आठ कोटी कामगारांना दोन महिन्यांकरता प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य, आणि एक किलो चनाडाळ दिली जाणार आहे.
यासोबतच, रेशन कार्ड असलेल्या कामगारांना ते कार्ड आपल्या राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही वापरता येणार आहे. यासाठी केंद्राने 'वन नेशन वन रेशन कार्ड'ची घोषणा केली आहे. यामुळे साधारणपणे ६७ कोटी लोकांना फायदा होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. २०२१च्या मार्च महिन्यापर्यंत सर्व रेशनकार्ड धारकांना यामध्ये सामील करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, स्थलांतरित मजूर आणि शहरातील गरीब लोकांसाठी परवडणाऱ्या दरामध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्थाही सरकार करत असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. यासाठी शासकीय अनुदानित घरकुलांचे रुपांतर अॅफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस (एआरएचसी)मध्ये करण्यात येणार आहे.
हेही वाचा :अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या भाषणातील महत्त्वाच्या घोषणा..