हैदराबाद - या जगात पैसे आज आहेत तर उद्या नाही. पण एखाद्याने दिलेले आशीर्वाद मात्र, आपल्या सोबतच असतात, असा संदेश देत हैदराबाद येथील 84 वर्षीय मोहम्मद हनीफ हे रुग्णांना मोफत रुग्णालयात नेण्याचे काम करत आहेत. मागील तीन वर्षांपासून ते दररोज किमान दहा रुग्णांना रुग्णालयात पोहोचवितात त्या बदल्यात पैसे नको दुआ द्या, असे म्हणतात.
हैदराबादच्या झहरा नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद हनीफ यांनी 2006साली हज यात्रा केली आहे. पण, त्या हजचे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ही यात्रा सायकलने केली होती. त्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला होता. अनेक देश ओलांडून ते सौदी अरेबियाच्या मक्का, मदिना या शहरात पोहोचले होते. येणाऱ्या एक-दोन वर्षात त्यांना पॅलेस्टाईनच्या जेरूसलेमच्या जायचे आहे, तेही सायकलवर. त्यासाठी त्यांना प्रार्थना व आशीर्वादची गरज आहे, असे ते म्हणतात.
मोहम्मद हनीफ यांना आठ मुले आहेत. आठही मुले उच्च शिक्षित आहेत. मात्र, ते आपल्या मुलांवर विसंबून न राहता स्वतः रिक्षा चालवून स्वतःच्या गरजा पूर्ण करतात.