नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान दोघांनी काश्मीर वाद चर्चेद्वारे सोडवावा. या प्रश्नात तिसऱ्या कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इमॅन्युल मॅक्रॉन बोलत होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी काल (गुरुवारी) दोन दिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. मोदी आणि मॅक्रोन पॅरिसपासून ६० किमी लांब असेलल्या चँन्टीली येथे भेटले. यावेळी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
भारत पाकिस्तान प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सोडवण्यात यावा, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही करणार असल्याचे मॅक्रॉन यांनी सांगितले. काश्मीर मुद्द्यावर मी मोदींशी चर्चा केली. काश्मीर प्रश्नावरून भारत पाकिस्तानचे हिंसेचा मार्ग अवलंबू नये, प्रादेशिक स्थिरता बाळगावी. तसेच लोकांच्या हक्कांवर गदा न आणण्याचे आवाहन मॅक्रॉन यांनी केले. मात्र, यावेळी मोदींनी बोलताना काश्मीरचा उल्लेख टाळला. दहशतवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेण्याच्या मोदींच्या कल्पनेला मॅक्रोन यांनी पाठिंबा दिला.