रायपूर - राजनांदनाव जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक शहीद झाला आहे, तर चार नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.
काल(शुक्रवारी) रात्री उशिरा मदनवाडा येथील परधोनी गावाजवळ ही चकमक झाली. हा परिसर मानपूर पोलीस ठाण्यांतर्गत आहे. चकमकीची माहिती मिळताच जिल्हा पोलीस मुख्यालयातून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मागविण्यात आला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास अडथळे आले.