कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. या घटनेत ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ कार्यकर्ते भाजपचे तर १ तृणमूल काँग्रेस पक्षाचा आहे. बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बासिरहाट शहरात ही घटना घडली. तर दुसरीकडे बंगालच्याच दिनाजपूर जिल्ह्यात विजयी मिरवणूक काढण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत हिंसाचार झाला. यात पोलिसांसह अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे सत्र लोकसभा निवडणुकीपासून सुरूच आहे. यात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. शनिवारी (८ जून) सायंकाळी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बासिरहाट शहरात भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या हिंसाचारात बंदुका, हातबॉम्ब आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यतात आला आहे. या घटनेत भाजपचे ३ कार्यकर्ते जागीच ठार झाले असून तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात इतरही अनेक जण जखमी झाले आहेत.