वर्धा - विकासाच्या नावावर आज मोठ्या प्रमाणात निसर्गाचा विनाश सुरू आहे. यावर वेळीच ठोस पाऊल उचलेले गेले नाही तर, येत्या ६०-७० वर्षात ही पृथ्वी कोणत्याही सजीवांसाठी जागण्यायोग्य राहणार नाही. आत्ताचे प्रदूषण सजीवांकरता किती घातक आहे याचा मोजमाप करायची गरज नाही. पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठीची जागरुकता आमच्यात निर्माण व्हायची गरज असल्याचे मत आणि चिंता तिबेटचे पूर्व पंतप्रधान समदोंग रिनपोछे यांनी व्यक्त केली. यावर उपाययोजना म्हणून बापू आणि विनोबांनी ग्रामस्वराज्यचा मार्ग सांगितल्याचे सुद्धा ते म्हणाले. ते पवनार येथे आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात बोलत होते. अंतिम सत्रात महात्मा गांधी आणि विनोबांचा संदेश अधिक महत्त्वाचा असून ग्रामस्वराज स्वीकारून आपण आपल्या आयुष्यात मोठा बदल करू शकतो असेही ते म्हणाले.
आपल्याला विकास पाहिजे आणि विकास हा विनाशासोबत होत आहे. कारण विकासाची परिभाषा बदलली आहे. जितका मोठा विकास तितकाच मोठा विनाश होणार असल्याचे म्हणत त्यांनी यावर चिंता व्यक्त केली. विज्ञानाने आज प्रत्येक क्षेत्रात मोठे पाऊल उचलले आहे. त्याबरोबरच यात मोठ्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. सकारात्मक सफलता आणि आधुनिक चिकित्सा विद्या माणसाला वरदान ठरत आहे. मात्र, आजच्या युगात सर्वात मोठी समस्या ही वैश्वीकरणाची झाली आहे. या समस्येचे मूळ शोधून त्यावर उपाय म्हणून ग्रामस्वराज्यचा नारा महात्मा गांधी आणि विनोबांनी दिला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला