प्रणव मुखर्जींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक; म्हणाले, चांगल्या प्रकारे निवडणुका घेतल्या
'पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या काळापासून आतापर्यंतच्या निवडणूक आयुक्तांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाही. त्यांनी योग्य प्रकारे काम केले आहे,' असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडली, असे म्हटले आहे. सध्या विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाला सतत लक्ष्य केले जात आहे. असे असताना मुखर्जी यांनी हे विधान केले आहे. एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.
'पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या काळापासून आतापर्यंतच्या निवडणूक आयुक्तांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे. नेमणूक झाल्यापासून सर्व निवडणूक आयुक्त चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाही. त्यांनी योग्य प्रकारे काम केले आहे,' असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मुखर्जी यांनी हे विधान करण्याच्या एका दिवसापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने आत्मसमर्पण केले आहे,' असे म्हटले होते. 'त्यामुळेच निवडणूक आयोग आता निष्पक्ष आणि सन्माननीय राहिलेला नाही,' असेही ते म्हणाले होते. सध्या विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर भाजपला झुकते माप दिले जात असल्याबद्दल टीका केली जात आहे.