महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उच्चशिक्षित महिलेवर भिक्षा मागण्याची वेळ; विद्यार्थी परिषदेची होती उपाध्यक्ष

एके काळी अभ्यासात आणि राजकीय कामातही अग्रेसर असणाऱ्या हंसी, आज उपजीविकेसाठी हरिद्वारच्या गंगा घाटवर भिक्षा मागत आहेत. सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असतं असं का म्हणतात, हे हंसी यांचा जीवनपट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल...

By

Published : Oct 18, 2020, 9:43 PM IST

Updated : Oct 18, 2020, 9:54 PM IST

former-girls-vice-president-and-student-of-kumaun-university-hansi-prahari-begging-on-the-streets-of-haridwar
कुमाऊं विद्यापीठातील प्रसिद्ध विद्यार्थिनीवर भिक्षा मागण्याची वेळ; दोन विषयांत केलंय मास्टर्स, विद्यार्थी परिषदेच्या होत्या उपाध्यक्ष

हरिद्वार : दोन वेळा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली, आणि एकदा विद्यार्थी परिषदेची उपाध्यक्ष असलेली महिला आता काय करत असेल? असे जर कोणी विचारले, तर आपण विचार करतो, की तिला नक्कीच चांगली नोकरी असेल, चांगले घर असेल आणि सर्वसाधारण जीवन ती जगत असेल. उत्तराखंडमधील हंसी या मात्र याला अपवाद आहेत. एके काळी अभ्यासात आणि राजकीय कामातही अग्रेसर असणाऱ्या हंसी, आज उपजीविकेसाठी हरिद्वारच्या गंगा घाटवर भिक्षा मागत आहेत. सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असतं असं का म्हणतात, हे हंसी यांचा जीवनपट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल..

उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात रणखिला गाव आहे. या गावात लहानाची मोठी झालेली हंसी, आपल्या पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीही चांगली म्हणता येईल अशीच होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे, त्या गावात बहुतेक सर्व लोक हंसी यांना ओळखत. त्यांच्या वडिलांचा छोटासाच व्यवसाय होता. मात्र, आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी ते आग्रही होते.

कुमाऊं विद्यापीठातील प्रसिद्ध विद्यार्थिनीवर भिक्षा मागण्याची वेळ

छोट्याश्या खेड्यातून आलेली मुलगी झाली विद्यार्थी परिषदेची उपाध्यक्ष..

हंसी यांनीही मोठे होत आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले. छोट्याशा गावातून आलेल्या हंसींनी पुढे कुमाऊं विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्या अभ्यासात तर हुशार होत्याच; मात्र इतर अ‌ॅक्टिव्हिटीजमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. १९९८ ते २००० पर्यंत त्या कुमाऊं विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या.

विद्यापीठातच मिळाली होती नोकरी..

कुमाऊं विश्वविद्यालयातून घेतलंय पदव्युत्तर शिक्षण

कुमाऊं विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी आणि पॉलिटिकल सायन्स या विषयांमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. त्यानंतर विद्यापीठातील शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा असलेला सहभाग पाहून, त्यांना ग्रंथपालाची नोकरी देण्यात आली. चार वर्षांपर्यंत त्या कुमाऊं विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होत्या. यानंतर, २००८ सालापर्यंत त्यांनी काही खासगी नोकऱ्याही केल्या.

असे बदलले जीवन..

२०११नंतर मात्र त्यांच्या जीवनात अशा काही घटना घडल्या, ज्याबाबत कोणी कल्पनाही करु शकत नाही. हंसी यांनी सांगितले, की आपल्या वैवाहिक जीवनातील काही घटनांमुळे आपण आता असे जीवन जगत आहोत. याबाबत अधिक विचारणा केली असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, त्या अशा ठिकाणाहून आल्या आहेत, जिथे अशा गोष्टी बाहेर सांगितल्यास कुटुंबातील इतर सदस्यांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यांना आपले दोन भाऊ आणि इतर कुटुंबीयांना कोणताही त्रास द्यायचा नाही.

कुमाऊं विद्यापीठातील प्रसिद्ध विद्यार्थिनीवर भिक्षा मागण्याची वेळ; दोन विषयांत केलंय मास्टर्स, विद्यार्थी परिषदेच्या होत्या उपाध्यक्ष

वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे हंसी काही दिवस निराशेत होत्या. त्यानंतर त्यांचा धर्माकडे कल वाढला. आपल्या कुटुंबापासून वेगळे होत धर्मनगरीमध्ये राहण्यासाठी म्हणून त्या हरिद्वारला आल्या. तेव्हापासून त्या आपल्या कुटुंबापासून वेगळ्या राहत आहेत. या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली, ज्यामुळे त्या कुठेच नोकरी करु शकत नव्हत्या. शेवटी, आयुष्य त्यांना अशा स्थितीत घेऊन आले, की जगण्यासाठी भिक्षा मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

मुलाला शिकवतात इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत..

आपल्या सहा वर्षांच्या मुलासह राहतात फुटपाथवर

ईटीव्ही भारतशी बोलताना हंसी यांनी आपल्या आयुष्यातील बरेच चढ-उतार सांगितले, जे त्यांनी कदाचित कोणालाही सांगितले नसतील. भिक्षा मागून आपल्या सहा वर्षांच्या मुलाचे पालन करणाऱ्या हंसी यांना असा विश्वास आहे की, चांगले उपचार झाल्यानंतर त्या कोणतीतरी नोकरी करुन आपल्या लहान मुलाची काळजी घेऊ शकतील. त्यांना एक मुलगीही आहे, जी आपल्या आजीकडे राहते. मुलगा मात्र त्यांच्यासोबतच फुटपाथवर राहतो. अस्लखित इंग्रजी बोलणाऱ्या हंसी या आपल्या मुलालाही इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा भाषा शिकवतात. आपल्याकडे असलेले ज्ञान आपल्या मुलांना देण्याची त्यांची इच्छा आहे, जेणेकरुन ते दोघे शिकून सरकारी नोकरी मिळवतील.

मुख्यमंत्र्यांकडे कित्येक वेळा मागितली मदत..

मुख्यमंत्र्यांकडे कित्येक वेळा मागितली मदत..

हंसी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कित्येक वेळा मदतीची याचना केली आहे. कित्येक वेळा त्यांनी सचिवालय आणि विधानसभेमध्ये फेऱ्या मारल्या आहेत. मात्र, त्यांच्या पदरी आतापर्यंत निराशाच आली आहे. सरकारने मदत केल्यास आपण आजही आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकू, असा त्यांना विश्वास आहे.

राज्यसभेच्या खासदारांविरोधात लढल्या आहेत निवडणूक..

राज्यसभेच्या खासदारांविरोधात लढल्या आहेत निवडणूक..

हंसी यांनी राज्यसभेचे खासदार प्रदीप टम्टा यांच्याविरोधात निवडणूक लढली आहे. त्यांनी जेव्हा हे सांगितले, तेव्हा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी टम्टा यांची भेट घेत याबाबत विचारणा केली. यावर टम्टा यांनी हे खरे असल्याचे सांगितले. एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या निवडून आल्या असत्या तर, नक्कीच त्यांनी व्यवस्थेत काही बदल घडवले असते, असे टम्टा म्हणाले. दुर्दैवाने त्या ती निवडणूक हरल्या होत्या. टम्टा यांना जेव्हा समजले की, हंसी आता भिक्षा मागून जगत आहेत, तेव्हा त्यांनी तातडीने त्यांची मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांच्याबाबत विचारपूरही केली.

आवाहन..

हंसी यांची कथा सगळ्यांसमोर मांडण्याचे ईटीव्ही भारतचे उद्देश्य हेच आहे, की नोकरी करुन सन्मानाचे जीवन जगण्याचा त्यांचा हक्क त्यांना मिळावा. सुशिक्षित असूनही त्यांच्या वाट्याला जे जीवन आले, ते त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये...

Last Updated : Oct 18, 2020, 9:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details