नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांचा उल्लेख केला नाही. खासगी गुंतवणुकीची कमी आणि रोजगारांची निर्मिती करण्यात आपण कमी पडलो आहोत, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले.
डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सुरळीत करण्याचे प्रयत्न सरकारने सोडले आहेत, असे या अर्थसंकल्पातून निर्दशनाला येत आहे. खासगी गुंतवणुकीची कमी आणि रोजगारांची निर्मिती करण्यात आलेले अपयश याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उल्लेखही केला नाही आणि उपायही सुचवले नाहीत. याबाबत काम केले गेले नाही तर, देशातील करोडो नागरिकांना उभारी मिळणार नाही. 2019-20 या काळात आर्थिक विकास दर, वित्तीय तूट, कर गोळा करणे यांसारख्या साध्या गोष्टींची पूर्तता करण्यात सुद्धा अर्थमंत्री निर्मलाजी यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे 2020-21 या काळात त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील गोष्टींची पूर्तता करतील याची शाश्वती नाही, असे चिदंबरम म्हणाले.