नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. दरम्यान काही वेळापूर्वी चिदंबरम यांनी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. माझ्या विरुध्द कोणतेही आरोपपत्र दाखल नसून गेल्या काही तासांमध्ये बऱ्याच अफवा पसरवण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले आहेत.
लोकशाहीचा पाया म्हणजे स्वातंत्र्य आहे. जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी काही निवडायला सांगितले तर मी स्वातंत्र्य निवडेन, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि विवेक तन्खा उपस्थित होते.
गेल्या 24 तासांमध्ये बरेच काही घडले असून बर्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आरोपी नाही. माझ्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात असून सीबीआय किंवा ईडीकडून कोणतेही आरोपपत्र दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले.