बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी ट्विटरवरून बी. एस. येडियुराप्पा सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी पुराचे व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.
‘कर्नाटकात जोरदार पावसामुळे काही ठिकाणची जमीन पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विसकळीत झाले आहे. लोकांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, सरकार हातावर हात धरून पाहत राहिले आहे,’ असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ‘राज्यात सरकार आहे का? पुरामुळे केवळ समुद्रकिनारे आणि जवळच्या भागातील लोक संकटात आले आहेत असे नसून, संपूर्ण उत्तर कर्नाटक चिंतेत आहे. राज्य सरकारने तत्परतेने हालचाली करत पीडित लोकांना अन्न आणि निवारा पुरवावा,’ असे ते म्हणाले.
‘सध्या कोविड-19 च्या साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या महसूल मंत्र्यांनाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना नुकतेच बृहत बंगळुरू महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले आहे. आयुक्तांना सध्या महसूल खात्याद्वारे अधिकच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामुळे पूरस्थितीचे नियोजन कोलमडले आहे. बी.एस. येडियुराप्पा यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालावे,’ असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.