रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अजित जोगी कोमात गेल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील ४८ तास त्यांच्यावर कायम देखरेख ठेवण्यात येणार आहे.
शनिवारी प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रायपूरच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ आहेत. आज त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आहे.
अजित जोगी हे छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम २००० अंतर्गत १ नोव्हेंबरला २००० ला मध्यप्रदेशातून विलग होऊन छत्तीसगड राज्य अस्तित्वात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणूकांमध्ये अजित जोगी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.