मुंबई- बलात्काराच्या वक्तव्यावरून माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली आहे. ट्विटरवरून देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाना साधला आहे.
हेही वाचा -राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यानं शिवसेना नाराज, राऊत म्हणाले...'नो कॉम्प्रमाईज'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हेही वाचा -'पहिल्यांदा भ्रष्टाचाराचं गोमुख स्वच्छ करा', गंगा प्रदूषणावरून अखिलेश यादवांचा मोदींना टोला
देशात बलात्काराच्या घटना वाढल्या असून भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे. भारत 'मेक इन इंडिया' नाही तर 'रेप इन इंडिया' झाला आहे, असे वक्तव्य राहुल गांधीनी केले होते. त्यावरून भाजपने या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधीनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. यावरून संसदेतही गदारोळ झाला होता. या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते, माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, त्यामुळे मी मुळीच माफी मागणार नाही. आता या वक्तव्यावरूनही भाजप नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले होते.