नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांना ऑनलाइन १ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यांचे मित्र माजी न्यायाधीश बी. पी. सिंह यांचे अकाउंट हॅक करून हे कृत्य करण्यात आले आहे. न्या. लोढा यांनी दिल्लीतील मालवीयनगर पोलीस ठाण्याच्या सायबर गुन्हे विभागात तक्रार दिली आहे.
हॅकर्सची मुजोरी...सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच घातला १ लाखांचा गंडा
मालवीयनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर विभागात दिलेल्या तक्रारीत लोढा यांनी म्हटले आहे की, ९ एप्रिलच्या रात्री माजी न्यायमुर्ती बी. पी. सिंह यांच्यासोबत बोलत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या चुलत भावाच्या उपचारासाठी तत्काळ १ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. मी त्यांच्यासोबत फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क न झाल्याने मी मेलमध्ये दिलेल्या अकाउंट नंबरवर दोन वेळेस ५० हजार रुपये, असे १ लाख रुपये हस्तांतरीत केले.
न्यायमुर्ती बी. पी. सिंह यांनी ३० मे रोजी यांनी आपले ई-मेल अकांउट उघडून बघितले असता त्यांना अकाउंट हॅक झाल्याचे कळले. आर. एम. लोढा यांना बी. पी सिंह यांचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तत्काळ मालवीयनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यायमुर्ती लोढा हे सर्वोच्च न्यायालयाचे ४१ वे सरन्यायाधीश म्हणून २१०४ साली सेवानिवृत्त झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.