नवी दिल्ली - सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर जनता दलात (युनायटेड) प्रवेश केला आहे. यापूर्वी पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. त्यामुळे जनता दलात (युनायटेड) ते प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. नुकतेच त्यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्तीही घेतली आहे.
अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये प्रवेश
बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर संयुक्त जनता दलात प्रवेश केला. बिहारमध्ये पुढील महिन्यात निवडणूक होणार असून पांडे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
बिहार निवडणुकीत पांडे रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जदयुकडून ते निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत.पांडे कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबद्दलची चर्चा सुरू आहेत. तसेच त्यांच्याविषयीचे एक गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. 'रॉबिनहूड बिहार के' असे या गाण्याचे बोल आहेत.
गुप्तेश्वर पांडे 1987च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी होते. 31 जानेवारी 2019 रोजी गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी बनले. डीजीपी म्हणून गुप्तेश्वर पांडे यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021पर्यंत होता. अलीकडील काळात, ते वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहीले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधन प्रकरणात ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी आले होते.