नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये व्यापारासह अनेक मुद्द्यांवर आज चर्चा झाली. दोघांमध्ये विशेषत: व्यापारविषयक उपयुक्त आणि सर्वसमावेशक चर्चा झाली असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले.
आमच्या बाजूने एच-1 बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला गेला. अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासात भारतीय व्यावसायिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याकडे आम्ही लक्ष वेधले. सुरक्षेच्या बाबतीत अनेक गोष्टींवर एक मजबूत धोरणात्मक भागिदारी दोन्ही देशात होणार आहे. दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी असलेल्या संबंधावर चर्चा झाली. अमेरिकेत भारतीय वंशाचा एक चांगला आणि उत्साही समुदाय आहे, जो तेथील समाज आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतो. गेल्या पाच वर्षांपासून अमेरिका-भारतातील व्यापारी संबंध अधिक दृढ होत आहेत. अमेरिकेची भारतातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याविषयांवर चर्चा झाल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.