नवी दिल्ली - डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं कौतुकास्पद उत्तर दिले आहे. 'अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो', असे उत्तर झोमॅटोनं दिले आहे. या उत्तरामुळे झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
'माझी आर्डर एका हिंदू नसलेल्या डिलिव्हरी बॉयने दिली आहे. डिलिव्हरी बॉय बदलणे शक्य नसून मी आर्डर रद्द केल्यास पैसै परत मिळणार नसल्याचे झोमॅटो कंपनीने सांगितले. तुमच्याकडे जेवण घेऊन कोणता डिलिव्हरी बॉय येईल याची सक्ती तुम्ही करु शकत नाही. पैसै परत करू नका मात्र माझी आर्डर रद्द करा, असे ट्विट अमित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने केले.
यावर झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे. 'आम्हाला भारताच्या कल्पनेचा अभिमान आहे. आमच्या ग्राहकांच्या आणि भागिदारांच्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही व्यवसाय करताना मूल्यं पाळतो. त्यामुळे आमच्या मूल्यांच्या आड येणारा व्यवसाय गमावल्याबद्दल आम्हाला दु:ख वाटत नाही,' ' असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. यामुळे सध्या ट्विटरवर गोयल यांच कौतुक होत आहे.
मला तुमचे अॅप खुप अवडते. कंपनीचे कौतुक करण्यासाठी मला एक कारण दिल्याबद्दल धन्यवाद, असे टि्वट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.
"दीपिंदर गोयल तुम्हाला सलाम! तुम्ही भारताचा खरा चेहरा आहात! मला तुमचा अभिमान आहे." असे टि्वट माजी निवडणूक आयुक्त एस. वाई. कुरैशी यांनी केले आहे.