नवी दिल्ली- कोरोनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सशी खेळत बसण्याऐवजी कोरोना विषाणूवर लक्ष द्या, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत, राहुल म्हटले, की "देशासमोर मोठे संकट उभे असताना, आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सशी खेळत बसून देशाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणे सोडा. त्याऐवजी, कोरोना विषाणूला लढा देण्याकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष केंद्रित करा."
यासोबत या ट्विटमध्ये सिंगापूर प्रीमिअर ली हेन लूंग यांचा व्हिडिओ होता. ज्यामध्ये ते आपल्या देशातील नागरिकांना कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रेरित करत आहेत.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या रविवारी आपण आपले सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर, आज त्यांनी असे स्पष्टीकरण दिले, की येत्या रविवारी महिला दिन असल्यामुळे, मी माझे सोशल मीडिया अकाऊंट्स हे काही महिलांना वापरण्यास देणार आहे, जेणेकरून त्या लाखो लोकांना प्रेरित करू शकतील.
हेही वाचा :दिल्ली हिंसाचार : मृतांची संख्या ४८ वर, जीटीबी रुग्णालयातील आकिबने घेतला अखेरचा श्वास..