महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पहिल्या अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी घेतली डॉ. मनमोहन सिंग यांची भेट - new modi govt

५९ वर्षीय सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही काळासाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. हे सीतारामन यांच्यासाठी सर्वात आव्हानात्मक काम ठरणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन, डॉ. मनमोहन सिंग

By

Published : Jun 27, 2019, 5:35 PM IST

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतली. सीतारामन भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला संसदेत सादर करणार आहेत. अर्थमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी १९९१ मध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. १९९१ ते १९९६ या काळासाठी ते अर्थमंत्री होते. त्याआधी १९८२ ते १९८५ या कालावधीसाठी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. १९८५ ते १९८७ या कालावधीसाठी ते देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. पदभार स्वीकारल्यापासून सीतारामन यांची मनमोहन सिंग यांच्याशी पहिलीच भेट आहे.

मागील ३० वर्षांत ८६ वर्षीय डॉ. सिंग अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी सभागृहात नसल्याचे प्रथमच घडणार आहे. त्यांचा ३ दशकांचा राज्यसभेचा कार्यकाल याच महिन्यात संपला आहे. 'मी केवळ अपघाताने झालेला पंतप्रधानच (अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर) नव्हतो, तर अपघाताने झालेला अर्थमंत्रीही (अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर) होतो,' असे डॉ. सिंग यांनी म्हटले होते. मागील वर्षी डिसेंबर मध्ये 'बदलता भारत' (चेंजिंग इंडिया) या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.

५९ वर्षीय सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही काळासाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात सीतारामन यांना अर्थमंत्री पदावर बढती दिली आहे. हे सीतारामन यांच्यासाठी सर्वात आव्हानात्मक काम ठरणार आहे.

भाजप-प्रणित रालोआ सरकार ५ जुलैला यंदाच्या मार्च २०२० पर्यंत आर्थिक वर्षातील कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारने मागील कार्यकाळाच्या शेवटी १ फेब्रुवारीला नवीन सरकार येईपर्यंतच्या कालावधीसाठी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. डॉ. मनमोहन सिंग यांनी या अर्थसंकल्पाला 'निवडणूक अर्थसंकल्प' असे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details