नवी दिल्ली - कांद्याच्या वाढत्या दराचा प्रश्न देशभरात चर्चेत असताना तो आता संसदेतही पोहचला आहे. या प्रश्नावर बोलताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मात्र, आपण कांदा खात नसून माझ्या कुटुंबात कांद्याला विशेष महत्व दिले जात नसल्याचे वक्तव्य केले आहे.
'मी आणि माझं कुटुंब कांदा खातच नाही...' कांदा दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं अजब उत्तर - कांदा दरवाढ
अर्थव्यवस्थेची ढासाळती स्थिती आणि त्यावर सरकारकडून दिली जाणारी चालढकल उत्तरे यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. असेच कांद्याच्या वाढत्या दराबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
देशभरात कांद्याच्या वाढत्या दरांनी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. कांद्याने प्रतिकिलो शंभरी पार केल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. याच प्रश्नावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न मांडला. यावर उत्तर देण्यासाठी अर्थमंत्री सितारामन उभ्या राहिल्या असता विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी त्यांना कांदा प्रश्नावरून चांगलेच धारेवर धरले. भाजपचे लोक कांदा खातात की नाही? असा उपरोधक प्रश्नही विरोधकांनी त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, "मी जास्त कांदा लसून आणि कांदा खात नाही. तसेच मी अशा कुटुंबात राहते जिथे कांद्याला जास्त महत्व दिले जात नाही", असे उत्तर दिले.
निर्मला सितारामन यांच्या तापट स्वभावामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. ढासाळत्या अर्थव्यवस्थेबाबतही काही उलट सुलट आणि असंबंध उत्तरे दिल्याने विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला होता. समाज माध्यमांवरही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. कांद्याच्या मुद्द्यावरूनही सितारमन यांना ट्रोलचा सामना करावा लागत आहे.