भोपाळ - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजपने तेथे सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यपाल लाल जी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी ११ वाजता (१६ मार्च) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कमलनाथ यांची कसोटी लागणार आहे.
सत्तेसाठी 'कमल'नाथ यांची कसोटी, उद्या करावे लागणार बहुमत सिद्ध - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
राज्यपाल लाल जी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी ११ वाजता (१६ मार्च) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कमलनाथ यांची कसोटी लागणार आहे.

उद्यापासून (१६मार्च) मध्य प्रदेशचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर लगेच कमलनाथ यांना त्यांचे बहुमत सिद्ध करावे लागेल. आता या बहुमत चाचणीत काँग्रेस त्यांचे सरकार टिकवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे सरकार धोक्यात आले होते. कारण सिंधिया यांच्या प्रवेशाबरोबर २२ आमदारांनी राजीनामे दिले होते.
मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० जागा आहे. त्यामध्ये काँग्रेसकडे असलेल्या ११४ जागांपैकी २२ आमदारांनी जारीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे आता ९२ आमदारांचे संख्याबळ आहे. तर भाजपकडे १०७ जागा आहेत. जर काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाले तर भाजपची सत्ता येणास कोणतीही अडचण येणार नाही. कारण २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने बहुमताचा आकडा १०४ वर येणार आहे.