पाटणा - बिहारमधील पूरस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये साडेसात लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. ही माहिती राज्य आपत्ती निवारण विभागाने दिली आह
आपत्ती विभागाने सांगितलेल्या माहिती प्रमाणे गुरुवारपर्यंत पाच लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, सीतामढी, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, खगरिया आणि गोपालगंज या भागात सर्वात जास्त पुराचा फटका बसला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागातर्फे बिहारमध्ये 30 पथके कार्यरत आहेत. तसेच राज्य पातळीवरील आठ पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत या पथकांनी 36 हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
14 हजार नागरिकांना निवारा गृहामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच 80 हजार लोकांना 192 स्वयंपाक गृहातून अन्न पुरवले जात आहे. बिहारचे पर्यावरण मंत्री प्रमोद कुमार म्हणाले, मी पूरग्रस्त क्षेत्राचा दौरा केला असून, सर्व नागरिकांना मदत करण्याचे योजिले आहे. पुढे ते म्हणाले पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येकी सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री महापूर संकट निवारण करण्यासाठी अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले.