हैदराबाद - मागील अनेक वर्षांचा रेकार्ड मोडत मागील चार दिवसांपासून हैदराबादसह तेलंगाणा राज्याला पावसाने झोडपले आहे. तेलंगाणामध्ये पावसाने केलेल्या हाहाकारात गेल्या काही दिवसात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक कोटींचे नुकसान झाल्याचे तेलंगाणा सरकारचा अंदाज आहे. पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन सध्या पूर्वपदावर येत आहे. हैदराबादमधील रचकोंडा भागातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत व त्यांच्या टीमने पुराच्या पाण्यात उतरून अनेकांना 'सहारा' दिला आहे.
हैदराबादमध्ये १९१६ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, असे तेलंगाणाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेला त्वरित मदतकार्य करण्यासाठी तेलंगाणा सरकारने ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर पावसाच्या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही तेलंगाणा सरकारने जाहीर केली आहे. ज्या व्यक्तींचे घर पावसाने पूर्ण उद्धवस्त झाले असल्यास त्यांना सरकारकडून नवीन घर बांधून देण्यात येणार आहे. तर घराचे नुकसान झाले असल्यास सरकारकडून अंशत: आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हैदराबादमधील ३५ हजार कुटुंबांना फटका बसल्याचे तेलंगणा सरकारने सांगितले. नागरिकांनी तात्पुरती राहण्यासाठी सोय व्हावी, यासाठी सरकारने ७२ निवारागृहे सुरू केली आहेत.