पणजी - मल्हारी अभयारण्यक्षेत्रात झालेल्या वाघांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांना आज वाळपईच्या प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. दंडाधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर १० दिवस हजेरी लावण्याच्या अटीवर विठो पावणे, मालो पावणे, बोमो पावणे, ज्योतिबा पावणे, भैरू पावणे यांना जामीन दिला आहे.
आज झालेल्या सुनावणीत सरकारच्या वतीने अॅड. निखिल वझे यांनी तर संशयित आरोपींच्या वतीने अॅड. यशवंत गावस यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अटी घालून जामीन मंजूर केला आहे. याविषयी बोलताना अॅड. वझे म्हणाले, वाघांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे, संशयितांच्या जामीनाला सरकार पक्षाच्या वतीने विरोध करत कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने तपासाला सहकार्य करावे आणि पुढील १० दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावावी असे निर्देश देत जामीन मंजूर केला आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी १० दिवसांत तपास पूर्ण करत अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.